today news, शिवना टाकळी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम अपूर्ण ; लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित

शिवना टाकळीचे तीन दरवाजे उघडले ; 1115 क्युसेक पाणी विसर्ग 

जफर ए.खान 
----------------------

वैजापूर, ता.17 -  गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून सद्या प्रकल्पात 88.32 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शुक्रवारी रात्री धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून शनिवारी (ता.17) सायंकाळपासून 1115 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. मात्र, प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.

20 वर्षे झाली तरी उजव्या कालव्याचे काम अपूर्ण ...

शिवना टाकळी प्रकल्प पूर्ण होऊन तब्बल वीस वर्षे झाली तरी उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने लाभक्षेत्रातील धोंदलगांव व परिसरातील गावांना अद्याप या प्रकल्पाचे पाणी मिळालेले नाही. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण चाऱ्याचे काम व अस्तरीकरण करून येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आम्हाला मिळवून द्यावे.अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.

ठेकेदाराच्या नावावर बील काढणारा राजकीय नेता कोण ?

शिवना टाकळी प्रकल्प 2005 ला पूर्ण होऊन तब्बल वीस वर्षे होऊन गेले. प्रकल्पाच्या 55 किलोमीटर लांबीच्या कॅनालसाठी धोंदलगांवसह पंचक्रोशीतील उंदीरवाडी, संजरपुरवाडी, राहेगांव, अमानतपुरवाडी, परसोडा, करंजगाव, दहेगाव व राहेगव्हाण या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. वीस वर्षे उलटूनही या गावांतील शेतकऱ्यांना अद्याप शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी मिळालेले नाही. प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण होऊन या कालव्याचे पाणी मिळाले तर या भागातील सिंचनाचा प्रश्न सुटेल व बोर दहेगांव मध्यम प्रकल्पातही पाणीसाठा उपलब्ध होईल. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून शिवना टाकळी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम रखडलेले असून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. कालव्याचे काम अद्यापही पूर्ण का करण्यात आले नाही व या कालव्याचे काम करणारा ठेकेदार व ठेकेदाराच्या नावावर बील काढणारा राजकीय नेता कोण ? असा प्रश्न या भागातील शेतकरी गोकुळ संतराम सुरासे यांनी उपस्थित केला आहे.तर कालव्याच्या कामासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
शिवना टाकळी प्रकल्पातून 1115 क्युसेकने विसर्ग ...

दरम्यान, शुक्रवारी (ता.15) रात्री अकरा वाजता शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात येऊन 2280 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू होता. शनिवारी (ता.16) सायंकाळी सहा वाजल्यापासून विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या 1115 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शिवना टाकळी प्रकल्पातून पिकांसाठी पाणी सोडण्याची सुचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती शहापुरे व उपअभियंता मोहम्मद अशफाक यांना केली होती. आ.बोरणारे यांच्या सूचनेवरून शुक्रवारी (ता.15) दुपारी अकरा वाजता 80 क्युसेकने शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मोहम्मद अशफाक, शाखा अभियंता शिषीर गांजाळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक समीर लहाने, यशवंत चव्हाण यावेळी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी पाणी विसर्ग कमी करण्यात आला असून 2280 क्युसेकमध्ये कपात करून सद्या 1115 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पाची पाणी पातळी 561.25 मीटर आहे. प्रकल्पाची पाणी पातळी कायम ठेवून पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल अशी माहिती उपअभियंता मोहम्मद अशफाक यांनी दिली.
 



                                  


Post a Comment

0 Comments