वैजापूर, ता.19 - बाजार समितीत वेगवेगळ्या पक्ष विचाराचे 18 संचालक आहेत परंतु संचालक मंडळातील सर्वांनी आपले कुटुंब समजून राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे असे आ.रमेश पाटील बोरणारे यांनी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले बाजार समितीसाठी घेतलेल्या दहा एकर जागेचे डेव्हलपमेंट कधी करणार ? असा सवालही शेतकऱ्यांच्यावतीने आमदार यांनी यावेळी उपस्थित केला.
वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण शुक्रवारी (ता.19) कांदा मार्केटमध्ये उत्साहात पार पडली. सभापती रामहरी जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. बोरणारे यांनी कांद्याला वाढीव भाव द्या अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केल्याचे सांगितले. या सभेत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जांबरगाव येथील उपबाजाराचे नामकरण 'कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे सर' असे करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. सभेला सभापती रामहरी जाधव, नगराध्यक्ष साबेर खान, हाजी अकिल शेख, बाबासाहेब जगताप, संजय बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, प्रशांत पाटील सदाफळ, उल्हास ठोंबरे, ज्ञानेश्वर जगताप, एल.एम.पवार, कल्याण दांगोडे, बाजार समितीचे संचालक दिपक राजपूत, रियाज शेख, प्रशांत त्रिभुवन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार बोरणारे यांनी बाजार समिती ही कुणा एका पक्षाची नसून ही शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे.असे सांगून, यंदा वैजापूर तालुक्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याने बाजार समितीने सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मकाला योग्य भाव द्यावा अशा सूचना देखील त्यांनी केल्या. एका कांदा व्यापाऱ्याने चारशे शेतकऱ्यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. मात्र बाजार समितीने शेतकऱ्यांना 50 टक्के रक्कम व्यापाऱ्यांकडून जमा होणाऱ्या सेसमधून दिली. राज्यात असा निर्णय घेणारी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पहिली बाजार समिती ठरल्याचे बोरणारे यांनी बोलताना सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकदा वखार महामंडळाला भेट द्यावी तेथे शेतीमालाची प्रतवारी व वर्गीकरण कशाप्रकारे केले जाते याचा देखील अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.
आता पुन्हा एकदा षटकार मारणार...
रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे काम करून एक षटकार ठोकला. आता वैजापूर तालुक्यात प्रलंबीत असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी आज मुंबईला जात आहे. या प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक करण्याची माझी इच्छा आहे व हे काम पूर्णत्वास नेऊन मी आता लवकरच पुन्हा एक षटकार ठोकणार आहे. असे आ.बोरणारे म्हणाले.
सभा लवकर गुंडाळल्याचा आरोप...
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा कांदा मार्केटच्या परिसरात शुक्रवारी दुपारी पार पडली. मात्र ही सभा अवघ्या 50 मिनिटात गुंडाळण्यात आली असा आरोप करून या सभेदरम्यान केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यामुळे ही पक्षाचीच सभा होती की काय असा देखील प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
प्रश्न मांडायचे होते पण.....
आम्हाला शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत प्रश्न मांडायचे होते मात्र वेळीच सभा गुंडाळल्याने आम्हाला बोलण्याची संधीच मिळाली नाही.सर्वसाधारण सभा म्हणजे एक प्रकारचे अधिवेशनच असते, मात्र सहकारातील डाव या सभेदरम्यान समोर आलेच.हा शेतकऱ्यांवर अन्यायच आहे.
- गणेश तांबे (शेतकरी नेते)
चर्चा झालीच नाही...
बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झालीच नाही असे आजपर्यंत कधीच झाले नाही.आजच्या सभेत विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळच देण्यात आला नाही. त्यामुळे ही सभाच झाली नाही असे आम्ही गृहीत धरतो. हा लोकशाहीचा खूनच आहे
- नंदकिशोर जाधव
0 Comments