गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ
-----------------------------------------------------
पाचोड,ता.19 - खादगाव येथील शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केली आहे. गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खादगाव- खेर्डा रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन पिकाची नासाडी होत असल्याने येणारे पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीन्वये घटनास्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडळाधिकाऱ्याने प्रतिवादी शेतकऱ्याशी संगनमत करून उलट तक्रारदार शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने अपमानित झालेल्या संजय कोहकडे या शेतकऱ्याने पंचनामा सुरू असतांना अधिकारी - कर्मचारी व ग्रामस्थासमोरच विहारीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खादगाव (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.16) घडली.
या प्रकरणी मंडळाधिकारी, तलाठी व प्रतिवादी शेतकऱ्याविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उत्तरणीय तपासणी व अंत्यसंस्कारास हरकत घेत पाचोड (ता .पैठण) च्या ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. पाचोड पोलिसांनी मध्यस्ती करून दोषीं व्यातींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर संजय कोहकडे यांच्या नातेवाईकानी मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार केले. दुसऱ्यादिवशी मयत शेतकऱ्याची पत्नी वनिता कोहकडे व नातेवाईक पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, पाचोड पोलिसांकडून जबाब नोंदवून घेण्यात आला परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यानंतर दोषीविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
0 Comments