जालना, ता.06 - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून यासाठी 2 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अमोल खुणे आणि दादा गरुड अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार परळीतील एका नेत्याने काही कोटी रुपयांची ऑफर देत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी या कटामधील सूत्रधार कोण आहे आणि त्यांनी नेमकी भूमिका काय आहे याचा शोध सुरू केला आहे.
0 Comments