वैजापूर, ता.21 - तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड येथे वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. पंचगंगाचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड (पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली महालगाव येथे ऊस वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील वाहनचालक, ट्रॅक्टर-ट्रॉली चालक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी उपस्थित ऊस वाहनचालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की वाहनांवर रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर लावणे अत्यावश्यक असून ओव्हरलोडिंग पूर्णतः टाळणे ही कायदेशीर व सुरक्षितेची गरज आहे. ट्रॉलीची योग्य आणि सुरक्षित बांधणी, वाहतुकीदरम्यान वेगमर्यादांचे काटेकोर पालन आणि नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई या सर्व बाबींविषयी त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.
ही जनजागृती मोहीम राबविताना पंचगंगा शुगरतर्फे उस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर बोर्ड व रेडियम स्टिकर्स बसविण्यात आले. यामुळे रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढून अपघातांची शक्यता कमी होईल, असे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले. वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार सूर्यवंशी, संपकाळ, किशोर घुगे, विजय गायकवाड, श्रीकांत चेळेकर, कॉन्स्टेबल योगेश दारवांटे उपस्थित होते. पंचगंगा शुगर & पॉवरचे संचालक तेजस शिंदे, अधिकारी संदीप शेळके, अमोल माने, गणेश गोलाईत आणि मेजर सचिन चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहनचालक व नागरिक उपस्थित होते.
0 Comments